“ज्ञानेशांचा संदेश”
“सार्थ हरिपाठ”
“अभंग २२ वा”

शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज नामाचा उत्कृष्ट असा सिद्धांत सांगतात, तो म्हणजे नाम हे आकाशापेक्षा मोठे आहे. *ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड।* *गगनाहूनि वाड नाम आहे।।*

भगवन्नाम हे आकाशापेक्षां तीन प्रकाराने मोठे आहे.
पहिला प्रकार : आकाश हे पांच महाभूतांपैकी एक आहे व ते जड आहे. याच्या उलट नाम हे चैतन्यघन आहे. याचे कारण ते चैतन्याचे शुद्ध स्फुरण आहे म्हणून.
एका जनार्दनी नाम। शुद्ध चैतन्य निष्काम।।

चैतन्य हे जडापेक्षां श्रेष्ठ असल्याने चैतन्यघन असे नाम जड आकाशापेक्षां श्रेष्ठ आहे हे सिद्ध होते.

दुसरा प्रकार : आकाश अत्यंत विस्तृत व व्यापक आहे. सर्व भूतमात्रांना आपल्या पोटात ठेवण्याचे सामर्थ्य या आकाशात आहे. परंतु आकाश हे जड असल्याने त्याला कोठेतरी सीमा आहे व शिवाय भूतमात्रांना तारण्याचे सामर्थ्य आकाशात नाही. याच्या उलट भगवंताच्या नामाचा महिमा एवढा अगाध आहे की, त्याला सीमा नाही.
नामाचा महिमा कोण करी सीमा।
जपा श्रीरामा एक्या भावे।।
त्याचप्रमाणे भूतमात्रांना तारण्याचे सामर्थ्य नामात आहे.
नामेचि तारिले कोट्यानु हे कोटी।
नामे हे वैकुंठी बसविले।।

✅ इतर पदार्थ किंवा वस्तूंसारखे भगवंताचे स्वरूप स्थूल, जड व एकदेशीय नसून ते अत्यंत सूक्ष्म, चिन्मय व सर्वव्यापी असते. भगवन्नाम हा दिसावयास जरी साधा शब्द दिसला तरी प्रत्यक्षात चिदाकाशात होणारे चैतन्याचे स्फुरण हे त्याचे एक टोक असते, तर शब्दरूपाने आकाराला आलेले नाम हे त्याचे दुसरे टोक असते.

भगवन्नामाच्या उच्चारात भगवंताचे कळत-नकळत स्मरण चालू असते. या स्मरणाच्या प्रभावाने “ब्रह्मस्वरूप चिदाकाशात” शुद्ध स्फुरण घडू लागते. शुद्ध स्मरणाच्या प्रभावाने ब्रह्मस्वरूप आत्मतत्त्वात स्फुरण होऊन प्रत्यक्ष ब्रह्मच नामरूपाने साकार होते.

नामदेव महाराज सांगतात-
१) आकारला देव नामरूपा आला।
म्हणुनी स्थापिला नाम वेदी।।
२) नाम तें ब्रह्म नाम तें ब्रह्म।
नामा पाशी नाहीं कर्म विकर्म।।

ब्रह्म हे सच्चिदानंद स्वरूप आहे. नाम हे ब्रह्माचे स्फुरण असल्यामुळे नामही सच्चिदानंद स्वरूप आहे.
अशा या भगवन्नामात भगवंत सूक्ष्म रूपाने वास करतो. किंबहुना नाम रूपाने तो वास करतो असे म्हणणेच योग्य होईल.
चौदा भुवने जया पोटीं।
तो राहे भक्ताचिया कंठी।।
चौदा भुवने ज्या हरीच्या पोटात असतात तोच हरी भक्ताच्या कंठात हरिनामाच्या रूपाने वास करतो, “भगवंत हा सर्व शक्तिमान, सर्वज्ञ व सर्वव्यापी” असल्यामुळेच भगवन्नामाचे दिव्य पण सूक्ष्म रूप त्याला धारण करता येते.
आणि म्हणूनच नाम आकाशापेक्षा वाड-मोठे-श्रेष्ठ आहे.

तिसरा प्रकार : आकाशासकट अनंत ब्रह्मांडे भगवंताच्या उदरात आहेत.
अनंत ब्रह्मांडे जयाचिये उदरी।
तो बालक हरि हा नंदाघरी।।

असा हा हरि भगवन्नामाला संपूर्ण वश होतो. भगवंताला अंकित करून घेण्याचे सामर्थ्य नामात आहे, परंतु ते आकाशात नाही. म्हणून नाम आकाशापेक्षा वाड, मोठे, श्रेष्ठ आहे.

नामाचे हे माहात्म्य ओळखूनच ज्ञानेश्वर महाराज सर्वांना उपदेश करतात-
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा।
पुण्याची गणना कोण करी।। *-- सद्गुरू श्री वामनराव पै* *✍️ स. प्र. (sp)1073*

error: Content is protected !!