“ज्ञानेशांचा संदेश”
“सार्थ हरिपाठ”
“अभंग २१ वा”

शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात-
ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ।
पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा।।

याचा भावार्थ असा की, आमच्या पूर्वजांनी सांग असा हरिपाठ उपलब्ध केला, म्हणूनच आम्हांला वैकुंठीचा मार्ग सोपा झाला. व्यवहारात सुद्धा आपण पूर्वजांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगतो, पूर्वजांचा महिमा वर्णन करतो व पूर्वजांनी जे लहान मोठे शोध लावले त्यांचा लाभही आपण घेतो.

खरे सांगायचे म्हणजे आपण सर्व आपल्या पूर्वजांचे विविध प्रकारे ऋणी आहोत. भगवन्नामाचा अद्भुत शोध आमच्या पूर्वजांनीच लावला, त्या नामाचा महिमा आमच्या पूर्वजांनीच सांगितला व हरिनाम हे “सांग” आहे म्हणजे सर्व अंगाने युक्त आहे.

वैकुंठीची जवळची वाट हरिनामच आहे, हे सर्व आमच्या पूर्वजांच्या कृपेने कळले, म्हणूनच आम्हांला वैकुंठीचा मार्ग सोपा झाला.

ही गोष्ट लक्षात ठेवूनच ज्ञानेश्वर महाराज पहिल्याच अभंगात,
“ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा”
या शब्दात व्यासांचे पूर्वजांचे आमच्यावर जे ऋण आहे, त्याचा उल्लेख करतात. नामस्मरण हीच वैकुंठीची वाट आहे व त्याच वाटेने आमचे पूर्वज वैकुंठाला गेले ही गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी अन्य ठिकाणी स्पष्ट केली आहे. ते म्हणतात —
ज्ञानदेवी अभ्यास मोठा। नामस्मरण मुखांवाटा।।
पूर्वज गेले वैकुंठा। हरि हरि स्मरतां ।।

तुकाराम महाराज तेच सांगतात-
अजामिळ पापराशी। नामें नेला वैकुंठासी।।
किंवा
वैकुंठासी जावे। तुका म्हणे त्याच्या नांवे।।

तात्पर्य, नाम ही वैकुंठाची जवळची वाट आहे, हा शोध आमच्या पूर्वजांनी अत्यंत परिश्रम करून लावला.

निळोबाराय सांगतात-
संत एकांती बैसले। सर्वही सिद्धांत शोधिले।।
ज्ञानदृष्टी अवलोकिले। सार काढिले निवडोनि।।
ते हे श्रीहरिचे नाम। सर्वपातकां करी भस्म।।
अधिकारी उत्तम अथवा अधम।
चारी वर्ण नर नारी।।

त्याचप्रमाणे नाम हे सांग आहे असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. नामाकडे कुठल्याही ”अंगाने” पाहिले तरी ते पूर्ण आहे असे आढळून येईल.

नाम सर्वांगाने-सर्वगुणाने कसे युक्त आहे ते पहा :-

१) नाम अमोल पण बिनमोल आहे.

२) नामाच्या ठिकाणी वर्णभेद, आश्रमभेद किंवा जातीभेद नाही.

३) नामाच्या ठायी स्त्री-पुरूष भेद नाही.

४) नामाला काळ-वेळेचे बंधन नाही.

५) नामाला शुचि-अशुचिचे नियम नाहीत.

६) नामाला सोवळे-ओवळे नाही.

६) नामाला साक्षरतेची किंवा विद्वतेची जरूरी नाही.

८) नाम घ्यावयास कष्ट नाहीत.

९) नाम स्वयंपूर्ण आहे म्हणजे नामाला इतर उपकरणांची किंवा उपचारांची जरूरी नाही.

१०) नाम हे प्रत्यक्ष स्फुरद्रूप परब्रह्म आहे.

असे हे सांग नाम पूर्वजांनी मोठे परिश्रम करून उपलब्ध केले म्हणूनच आम्हांला वैकुंठीचा मार्ग सोपा झाला.

आपल्या पूर्वजांचे हे ऋण फेडण्याचा मार्ग म्हणजे त्यांनी दिलेले हे सांग नाम कंठात अखंड धारण करणे हाच होय. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सर्वांना उपदेश करतात-
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा।
पुण्याची गणना कोण करी।। *--- सद्गुरू श्री वामनराव पै* *✍️ स. प्र. (sp)1070*

error: Content is protected !!