“ज्ञानेशांचा संदेश”
“सार्थ हरिपाठ”
“अभंग २२ वा”
तिसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात–
हरिविण जन्म नर्कचि पै जाणा।
यमाचा पाहुणा प्राणी होय।।
➡️ जीवनात जर रामनाम नसेल तर जगण्यात राम नाही, ते जिणे व्यर्थ होय. किंबहुना …. ते जीवन म्हणजे “विषय-विषाने” भरलेला नरकच होय.
ज्ञानेश्वर महाराजांचे हे विधान सर्वसाधारण मनुष्याला पटणार नाही. याचे कारण विषयसुखाच्या पलीकडे त्याची दृष्टीच गेलेली नसते. डुकराला विष्ठेच्या पलीकडे कांही रुचकर पदार्थ आहेत याची कल्पनाच नसते व म्हणून तो त्या नरकातच लोळत रहातो.
त्याचप्रमाणे विषयसुखाच्या पलीकडे अत्यंत श्रेष्ठ असा “प्रेमानंद” आहे, याची कल्पना “माणसातल्या श्वानसूकरांना” नसते व म्हणून ते विषय सुख-दुःखातच पिचत पडतात.
तुकाराम महाराज सांगतात-
तरीच जन्मा यावे। दास विठोबाचे व्हावे।।
नाहीतरी काय थोडी। श्वान सूकरे बापुडी।।
यालाच ज्ञानेश्वर महाराज नरक असे म्हणतात. अशा लोकांना मृत्यूनंतर यम शिक्षा देण्यासाठी परलोकाला घेऊन जातो. *यमाचा पाहुणा प्राणी होय।*
याचा भावार्थ थोडक्यात पाहूं, ….
➡️ मनुष्य जिवंत असताना त्याच्या ठिकाणी असणाऱ्या जबरदस्त वासनेची तृप्ती तो जवळ पैसा असेल तर पैशाच्या जोरावर, पैसा नसेल तर कर्ज काढून किंवा अन्य प्रकाराने विषय भोगाने करू शकतो. व्यसनांच्या किंवा विषयांच्या आधीन झालेली ही माणसे सर्वसाधारणपणे जिवंतपणीच त्यांच्या कर्माने यमलोकाचे दु:ख भोगतात.
परंतु …. ✅ दैवयोगाने जर त्यांना हे जिवंतपणीच यमदुःख भोगावे लागले नाही तर मृत्युनंतर मात्र ते त्यांना चुकत नाही. याचे कारण असे की, ….
✅ मृत्यूनंतर स्थूल देह जातो पण सूक्ष्मदेहासकट वासना शिल्लक रहाते. मृत्युनंतर व पुढचा जन्म येईपर्यंतचा जो मध्यंतरीचा काळ त्या काळात अशा व्यसनी किंवा विषयासक्त लोकांचे फार हाल होतात.
याचे कारण असे की, ….
“सूक्ष्म देह” जवळ असल्यामुळे या लोकांना कोठेही गमन करता येते. अर्थात त्यांना पाहिजेत ते सर्व विषय त्यांच्या समोर हजर असतात, परंतु ….
त्यांचा भोग घेऊन वासनेची तृप्ती करावयास त्यांच्याजवळ “स्थूल देह” नसतो.
याचा परिणाम असा होतो की, …..
विषय जवळ असून भोगावयाला मिळत नाही म्हणून या लोकांची अत्यंत तडफड होते; व या तडफडीत यमाचे सर्व दुःख भरलेले असते.
खांबाला बांधून ठेवलेल्या “दारुड्या माणसाच्या” समोर जर दारूने भरलेले पिंप ठेवले तर त्याच्या जीवाची काय तडफड होईल याची कल्पना करावी,
अशीच तडफड मृत्यूनंतर “व्यसनी” किंवा “विषयी” लोकांची होते. यालाच “यमाचा नरकवास” असे म्हणतात.
(क्रमशः)
— सद्गुरू श्री वामनराव पै
✍️ स. प्र. (sp)1072