करुणा …एक सत प्रवृत्तीची…संवेदना…
मित्रांनो ,
कुठलंही परोपकारी सत्कृत्य आपल्या हातून घडण्यासाठी आपल्या मनात करुणा उत्पन्न होणे आवश्यक आहे!
साक्षात परमेश्वराला सुद्धा करुणानिधी म्हणून संबोधलं जातं! याचाच अर्थ– ज्याच्या अंतकरणात करुणेचा उगम होतो आणि त्याच्या हातून ज्यावेळी एखादी सेवा घडते, त्यावेळी तो जे जे सत्कर्म करतो त्या त्या वेळी तो साक्षात करुणानिधी म्हणून आपल्यासमोर उभा असतो!
“मानवसेवा हीच ईश्वर सेवा” हे जीवन तत्व बाळगून जीवन जगणाऱ्या व्यक्ती खरे खरे करुण निधीच असतात!
महारोग्याच्या जखमांवर उपचार करून त्यांच्यातले चैतन्य जागवणारे बाबा आमटे ज्यावेळी आनंदवनाची निर्मिती करतात!पंख झडलेली पाखरे सुद्धा ज्यावेळी चैतन्याचा स्पर्श झाल्यामुळे यशाच उंच शिखर गाठू शकतात त्यावेळी बाबा आमटे हे करूणेने ओतप्रोत भरलेले असे महामानव आपल्या सर्वांना वाटतात!
ते म्हणतात–
“शृंखला पायी असू दे! मी गतीचे गीत गाईन!
दुःख उजळण्यास आता, आसवांना वेळ नाही! पांगळ्यांच्या सोबतीला,
येऊ द्या बलदंड बाहू! आनंद निर्मितीची मुक्त गंगा या–
इथे मातीत वाहू…
या इथे मातीत वाहू. अशीच मदर तेरेसांनी वृद्धांची, अपंगांची सेवा करताना अनुभवली होती!
जीवघेण्या आजारामुळे ते लवकरच प्रभूच्या चरणी विलीन होणार आहेत अशा गलीतगात्र जीवांची सेवा करून आपल्याला काय मिळणार आहे?असा प्रश्न जेव्हा मदर टेरेसा यांना विचारला गेला? त्यावेळी त्या माऊलीने उत्तर दिलं की- ज्यांनी आयुष्यभर दुःखाच्या नरक यातना सहन केल्या त्यांना मरण तरी देवदुतासारख याव याच करूणेच्या भावनेने मी हे व्रत करीत आहे! मित्रांनो- मनात करुणा निर्माण होते त्याचवेळी आपण आपल्या घासातला एक घास त्याला देऊ करतो याला प्रकृती म्हणतात!
तिसरा प्रसंग असाच आहे तो उपाशी आहे! समोर पंचपक्वान भरलेले ताट आहे! समोरचा माणूसही तेवढाच उपाशी आहे! त्याला पाहून हा आपल्या समोरील ताट त्याला देऊन टाकतो!
स्वतः काही न खाता ही खरी संस्कृती आहे!
या संपूर्ण कृतीचा मूळ पाया म्हणजे मनात करूणेची भावना निर्माण होणे आणि तीच भावना प्रत्यक्ष कृतीत आणणे! अशी अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर रोजच घडत असतात!.
काही माणसांच्या मनात उत्पन्न होणाऱ्या त्या करूणेच्या माध्यमातून माणुसकीच दर्शन घडतं!
आमचा एक आमचा मित्र शिवाजीनगर स्टेशनला पुणे-मुंबई अप-डाऊन करणाऱ्या आपल्या पत्नीला सकाळी आठ वाजता रोज सोडायला जात असे! तिला सोडून आल्यानंतर स्टेशन लगतच्या भिकाऱ्यांच्या रांगेत एक भिकारी त्याला रोज भिक्षेसाठी याचना करायची. त्याच्या खिशातील देण्यासाठी सुट्टे पैसे त्याच्याकडे कधीच नसायचे त्यामुळे त्याला तिची नजरानजर झाली की शरमल्यासारखे वाटायच!
आपण इच्छा असूनसुद्धा तिला मदत करू शकत नाही केवळ आपल्या जवळ सुट्टे पैसे नाहीत म्हणून ही अपराधाची भावना त्याला नेहमी टोचत राहायची आणि एक दिवस त्याने ठरवले की- अत्यंत ताजा जेवणाचा संपूर्ण डबा तिला देऊन आपल्या अपराधाची पूर्ण भरपाई करायची असं त्यानं ठरवलं! या हेतून त्याने जेवणाचा डबा भरला! आपल्या पत्नीला सोडलं आणि त्याची शोधक नजर त्या म्हातार्या भिका- रणीला शोधण्यासाठी इकडे तिकडे पाहू लागली!
जवळपास ती कुठे दिसत नव्हती त्यामुळे त्याने आणखी शोध घेतला कारण त्याच्या मनात तिला मदत करण्याविषयी करुणेचा उगम झाला होता! शेवटी त्याच्या प्रयत्नाला यश आलं! स्टेशनच्या जवळच असणार्या एका झाडाखाली बसलेली ती आजी त्याला दिसली! आपल्याजवळील डबा त्याने तिच्या पुढे ठेवून तिच्या भावनांचा तो हळूच शोध घेऊ लागला! अतिशय हळुवार शब्दात ती त्याला म्हणाली बाबा- आजचं माझं भागलं आहे!
शेजारी दोन-तीन म्हाताऱ्या उपाशी आहेत! माझ्यासाठी हा आणलेला जेवणाचा डबा त्यांना नेऊन दिला तर मला खूप आनंद होईल! हा अत्यंत संवेदनशील मनातील तिचा विचार– तिच्या चेहर्यावरील आनंदरुपी आशीर्वाद त्याच्याही नकळत त्याला प्राप्त झाला! मित्रांनो- विवेकानंद स्वामींनी एकदा म्हटलं होत की–
“जो विधवांचे अश्रु पुसु शकत नाही, भुकेल्याला अन्न देऊ शकत नाही, माझ्यासाठी त्याच परमेश्वराने प्रत्यक्ष स्वर्गाच दार उघडलं तरी ते मी स्वीकारणार नाही!
प्रत्येक धर्माचा पाया करुणेवर आधारलेला आहे!
“धारयती सहा धर्माहा! जो एकमेकांना सहाय्य करतो- सहारा देतो-धारण करतो त्यालाच धर्म म्हणतात!
इस्लाम धर्म म्हणतो-_इबादत नही के- किसी
मंदिर या मज्जितमे सर झुका देना… या माला पिरो देना! बल्की
इबादतहै- किसी मासुमको जालीम से छुडा देना….. किसी बेसहाराको सहारा देना…..
सर्वधर्म वचनाचं जर पालन करायचं असेल तर- आपल्या मनात करूणेचा उगम झालाच पाहिजे!
आजचा विषय आपल्या पर्यंत पोहोचला असेल म्हणून मी इथेच थांबतो!
( शब्दांकन-ला.डॉ.शाळिग्राम भंडारी,तळेगाव दाभाडे)