मोदी पुन्हा सत्तेवर आल्यास ती शेवटची निवडणूक ठरेल!
फुले – शाहू – आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमाला – पुष्प तिसरे
पिंपरी:
“२०२४ मध्ये मोदी पुन्हा सत्तेवर आल्यास ती देशातील शेवटची निवडणूक ठरेल!” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. विश्वंभर चौधरी यांनी श्री दत्त मंदिर चौक, मोहननगर, चिंचवड येथे शनिवार, दिनांक १३ मे २०२३ रोजी केले. जय भवानी तरुण मंडळ आयोजित सहा दिवसीय फुले – शाहू – आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमालेत ‘भारतीय राजकारणाची दशा आणि दिशा!’ या विषयावरील तृतीय पुष्प गुंफताना डॉ. विश्वंभर चौधरी बोलत होते.
माजी नगरसेविका ॲड. वैशाली काळभोर अध्यक्षस्थानी होत्या; तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकर पांढारकर, उद्योजक भगवान पठारे, गणेश दातीर – पाटील, सुरेश चव्हाण आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. विश्वंभर चौधरी पुढे म्हणाले की, “२०१४ मध्ये नवे पंतप्रधान सत्तारूढ झाल्यावर खूप अपेक्षा होत्या; परंतु लवकरच अपेक्षाभंग झाला. अभिव्यक्तीवर घाला, बेमुर्वतपणा, सत्तेचा माज, न्यायव्यवस्था आणि राजकीय सत्ता यांचा परस्परपूरक व्यभिचार, ईडीचा गैरवापर अशा अनेक गोष्टींमुळे देशातील लोकशाही वेगाने अध:पतनाच्या दिशेने वाटचाल करते आहे.
रोहित वेमुला, अखलाख अशा निरपराध लोकांचे मृत्यू, ‘मन की बात’ हा एकतर्फी संवाद, अनेक स्वायत्त संस्था आणि नियोजन आयोगाचे खच्चीकरण, फक्त विरोधकांसाठी ईडीचा दहशतवादी वापर ही हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू झाली आहे.
सरकार म्हणजे देश, असे तत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यामुळे सामान्य माणसांनी काय लिहावे, काय वाचावे हे सत्ताधारी ठरवू लागले आहेत. बेरोजगारी, महागाई याविषयी प्रश्न विचारल्यावर देशद्रोही ठरवले जाते. राष्ट्रपिता, राष्ट्रध्वज यांचा अपमान करणारे आपल्याला राष्ट्रवाद शिकवायला लागले आहेत.
लहरीच्या एका फटक्यात नोटबंदी जाहीर केली गेली. अर्थकारणात एकटा अदानी समूह सक्षम ठरवला गेला आहे. वीस हजार कोटी रुपयांचा घोटाळा होऊनही त्याविषयी मोदी अवाक्षरही बोलायला तयार नाहीत. स्वातंत्र्योत्तर काळातील पंचाहत्तर वर्षांत विरोधी पक्षनेत्याचे सदस्यत्व काढून घेण्याचा प्रसंग पहिल्यांदाच घडला आहे. २०१४ पूर्वी देशात अनेक आंदोलने करण्यात आली; पण ती कधीच दडपण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाने केला नाही. तसेच बलात्कारी तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांचे स्वागतही यापूर्वी कधीच करण्यात आले नव्हते.
परवाचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे न्यायव्यवस्थेवर असलेल्या धडधडीत दबावाचे उदाहरण आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करावा अशा थाटात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पत्रकार परिषद घेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार हे अनैतिक आहे, ही जाणीव त्यांना सातत्याने करून देण्याची गरज आहे. तसेच मूळ हिंदू आणि संघीय हिंदू यांच्यातील फरक स्पष्ट करण्याची वेळ आली आहे.
कर्नाटकमधील निवडणूक निकाल ही त्यांच्या पतनाची नांदी आहे. पंतप्रधान देशाचे मालक नाहीत तर भाडेकरू आहेत. भारतीय लोकशाहीतील एकजिनसीपणा त्यांना नष्ट करायचा आहे. गांधी, नेहरू, पटेल, आंबेडकर, सुभाषबाबू यांच्यात वैचारिक मतभेद होते; पण शत्रूत्व कधीच नव्हते, हे समजून घेतले पाहिजे. नेहरूंनी देशाची पायाभरणी केली म्हणून मोदींना त्यांच्याविषयी प्रचंड राग आहे.
या पार्श्वभूमीवर मोदी, शहा पुन्हा निवडून यायला नको, अशी स्पष्ट आणि निःसंदिग्ध भूमिका घेऊन ‘निर्भय बनो!’ ही अराजकीय चळवळ कार्यरत होते आहे. सर्वांनी या जनआंदोलनात सहभागी व्हा!” असे आवाहन त्यांनी व्याख्यानाचा समारोप करताना केले.
ॲड. वैशाली काळभोर यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “तरुणाईचे प्रबोधन करण्यासाठी व्याख्यानमालांचे प्रभावीपणे नियोजन करावे!” अशी अपेक्षा व्यक्त केली. जय भवानी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले. मारुती भापकर यांनी आभार मानले.
- मोरया प्रतिष्ठानच्य पतंग महोत्सवाला वडगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- ‘ परीक्षेला सामोरे जाताना’ नि:शुल्क मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत नवलाख उंबरे शाळेचे यश
- दानशूर व्यक्तीमत्व हरपले, उद्योजक सी.एम.शहा यांचे निधन
- राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने वकृत्व व निबंध स्पर्धा