तळेगाव दाभाडे:
जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्याप्रकरणी आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांच्या विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची शुक्रवारी ता.१२ ला दुपारी पावणे दोनच्या सुमारास तळेगाव दाभाडे नगरपरिषदेसमोर निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
या प्रकरणी आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकर (रा. तळेगाव दाभाडे) आणि श्याम याचे तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी किशोर आवारे यांच्या आई, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर आवारे हे जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून सामाजिक काम करत होते. जनसेवा विकास सेवा आघाडीच्या माध्यमातून ते तळेगाव येथे राजकारणात देखील सक्रीय होते. त्यामुळे त्यांचे राजकीय विरोधक असलेले आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे आणि त्यांच्या कार्यकर्ते यांच्यात वाद होत असत.
मागील सहा महिन्यांपासून किशोर आवारे यांनी आमदार शेळके त्यांचे भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे त्यांच्या आईला सांगितले होते. १५सप्टेंबर २०२२ रोजी फिर्यादी यांच्या वाहन चालकाला तो फिर्यादी यांच्यासोबत असल्याने सुधाकर शेळके आणि त्यांच्या साथीदाराने जातीवाचक शिवीगाळ केली होती.
किशोर आवारे हे त्यांचा मित्र संतोष शेळके यांच्यासोबत फिरत असल्याची बाब सुनील शेळके आणि त्यांच्या भावाला आवडत नसे. संतोष शेळके यांना किशोर आवारे सतत मदत करत असत म्हणून सुनील शेळके आवारे यांच्यावर चिडून असे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
किशोर आवारे यांनी मागील दोन वर्षांपासून स्वत:चा वेगळा गट तयार करून सुनील शेळके यांना राजकीय विरोध केला. चुकीच्या कामाबाबत वेळोवेळी निदर्शने केली. या रागातून तसेच त्यांचे राजकीय वर्चस्व वाढू लागल्याने आमदार शेळके यांच्या वर्चस्वाला धोका निर्माण झाला असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास किशोर आवारे नगरपरिषद कार्यालयात गेले असता तिथे श्याम निगडकर आणि त्याच्या तीन अनोळखी साथीदारांनी बंदुकीच्या गोळ्या झाडून व कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार करून त्यांना ठार मारले असल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.
याबाबत आमदार सुनील शेळके व त्यांचे बंधू सुधाकर शेळके यांचे मोबाईल फोन ‘नॉट रीचेबल’ आहेत. त्यांच्याशी संपर्क होताच त्यांची बाजू प्रसिद्ध करण्यात येईल.
- लोणावळ्यातील दाऊदी बोहरा समाजाने सर्व केला मिलाद-उन-नबी (SA) साजरा
- वातावरणातील बदलानुसार भात पिकावरील कीड रोग व्यवस्थापन करा
- जपान आस्थापन सदस्यांची चैतन्य इंटरनॅशनल स्कूलला सदिच्छा भेट
- कार्ल्यात रंगला लेकी मागण्याचा पारंपरिक खेळ
- कार्ला परिसरात गौरी व गणरायाला भावपूर्ण निरोप गणपती बप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या जयघोष