“ज्ञानेशांचा संदेश”
“सार्थ हरिपाठ”
“अभंग १८ वा”
तिसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात-
मनो मार्गे गेला तो तेथे मुकला।
हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य।।
जीवापुढे दोन मार्ग असतात. एक बहिर्मुख होऊन मनोमार्गाने इंद्रियांच्या द्वारे विषयांच्या “आडरानांत” शिरून सर्वनाश ओढवून घेणे व दुसरा … अंतर्मुख होऊन मनोमार्गानेच नामाच्या द्वारे “हरिचरणी स्थिर” होऊन सर्वसुख प्राप्त करून घेणे.
विषयांच्या पाठी धावेल तो अभागी व हरिपाठी स्थिर होईल तोच धन्य होय. कारण “मनाची चंचलता हेच दु:ख व मनाची स्थिरता हेच सुख होय”. विषयाने मन चंचल होते तर हरिनामाने मन स्थिर होते, म्हणूनच सर्व संत नामाचा महिमा सांगतात.
शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात-
ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी।
रामकृष्णी आवडी सर्वकाळ।।
हरिनामाची गोडी माझ्या चित्तात जडून गेल्यामुळे माझे चित्त शुद्ध झाले व मला भगवच्चरणाच्या स्वरूपाची ओळख होऊन त्या ठिकाणी अखंड आवडी निर्माण झाली.
पुष्कळ लोक परमार्थ करतात पण त्यांचा तो परमार्थ फावल्या वेळेचा असतो, परमार्थाची गोडी किंवा आवडी मुळीच नसते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की, हरिनामाची गोडी लागली पाहिजे. विषयांची जशी गोडी आहे तशीच हरिनामाची गोडी लागली पाहिजे.
संतांच्या संगतीने व त्यांच्या उपदेश-श्रवणाने हरिनामाची गोडी चित्तात रूजते, उमलते, फुलते व त्याची चंचलता संपूर्ण नष्ट होऊन ते रामकृष्णी म्हणजे रामकृष्णचरणी, प्रभुचरणी स्थिर होते.
✅तात्पर्य, मुळात भगवंताबद्दल प्रिती, आवड, गोडी असली पाहिजे. त्यामुळे आपोआप आपलं मन त्याठिकाणी स्थिर होतं. म्हणजे मन त्या ठिकाणी ओढलंच जातं. *लाचावले मन लागलीसे गोडी।* *ते जीवे न सोडी ऐसे झाले।।*
त्या ठिकाणी मन हे जसा मुंगळा गुळाला चिकटतो आणि त्या गुळाला कसाच सोडायचा तयार नसतो. तसं आपलं मन देवाला चिकटतं.
कारण देव हा “सच्चिदानंद स्वरूप” असल्यामुळे त्या ठिकाणी गोडी आहे, आनंद आहे त्यामुळे तिथे एकदा मन चिकटलं की तिथून ते बाहेर यायला निघत नाही, यायला मागत नाही.
एकनाथ महाराज सागतात-
चित्त विसरोनि चित्ता।
जडोनि ठाके भगवंता।।
मनाची मोडली मनोगतता।
संकल्प विकल्पता। करूं विसरे।।
भगवंताचे चरण म्हणजे सर्वसुखाचे आगर होय.
सर्व सुखाचे आगर। बाप रखुमादेवीवर।।
तुका म्हणे आतां न मागे आणिक।
तुझे पायी सुख सर्व आहे।।
भगवच्चरणी स्थिर झालेल्या चित्ताला सर्वसुख, प्रेमसुख अखंड भोगता येते. *चित्त चाकाटले स्वरूपामाझारी।* *तें न निघे बाहेरी ऐसें झाले।।*
आणि म्हणून भगवच्चरणाचे ठिकाणी अखंड आवड निर्माण होते. परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, नामाचा अट्टाहासाने अभ्यास केल्याविना नामाची गोडी निर्माण होत नाही, हे ओळखूनच ज्ञानेश्वर महाराज सर्वांना उपदेश करतात- *हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा।* *पुण्याची गणना कोण करी।।* *--- सद्गुरू श्री वामनराव पै* *✍️ स. प्र. (sp)1060*
- इंदोरीच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूलची विज्ञान आश्रमात शैक्षणिक सहल
- शिरगावात दहा फुटी अजगराला जीवदान:वन्यजीव रक्षक संस्थेचा पुढाकार
- टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी: पद्मश्री पोपटराव पवार
- माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा :रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत भरला पुन्हा वर्ग
- नाणोली तर्फे चाकण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन