सेवेची जननी! {भाग क्रमांक ३}
मित्रांनो, पावसाळा नुकताच सुरू झालेला होता..जोशी नावाचे सूटबूट पोषाख केलेले गृहस्थ एका चांभाराच्या शोधात निघालेले होते..कारण त्यांच्या चपलेचा  झिजलेला तळ नवीन बसवून हवा होता.. इतक्यात रस्त्याच्या कडेला बसलेल्या चांभाराची आणि त्यांची नजरानजर झाली.आणि दुसर्‍याच
क्षणी ते सुटाबुटातील गृहस्थ जवळ आल्यानंतर सहाजिकच त्यांना बसायला चांभार दादाने स्टूल पुढे केलं !

आणि त्यांच्या हातातील चप्पल पाहून त्याच्या चटकन लक्षात आलं की त्यांना काय पाहिजे!आपल्या झिजलेल्या चपलेला तळ बसवण्याची विनंती जोशीबुवा यांनी चांभार दादाला केली.
अर्थात जोशींच्या काटकसरी स्वभावामुळे चांभार दादाशी त्यांची घासाघीस सुरू झाली.इतक्यात त्या चांभार दादाच लक्ष समोरून जाणाऱ्या हात गाडी वाल्याकडे गेलं.

नुकताच थोडा पाऊस पडल्यामुळे रस्त्यावर चिखल झालेला होता आणि हातगाडीवाला मोठ्या कष्टाने त्या चिखलातून हातगाडी लोटत असताना त्याच्या त्या धडपडीत त्या म्हाताऱ्या हमालाच्या चपलेचा तुटलेला अंगठा सहजच चांभार दादाच्या नजरेतून सुटला नाही.त्याचा चांभार दादाने आपल्या हातातलं सर्व काम बाजूला ठेवलं आणि म्हाताऱ्या हात गाडीवाल्याला विनंती केली की तुझ्या अंगठा तुटलेल्या चपलेला मी नवीन अंगठा बसून देतो .

अर्थात मला तुझ्याकडून *कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा नाही* कारण मला माहीत आहे की अजून तुला तुझ्या या कामाचे पैसे मिळायचे आहेत.पण तू मला फक्त तुझ्या सेवेची संधी दे कारण चुकूनही या धडपडीत तू घसरला आणि तुझ्या खुब्याचे हाड तुटलं तर मी कुठल्याही तुझ्या हॉस्पिटलचे बिल भरू शकणार नाही पण तुझ्या चपलेचा अंगठा दुरुस्त करून तुला घसरून पडण्यापासून वाचवू शकतो.

त्याप्रमाणे त्याच्या विनंतीला स्वीकारून त्या हमालाने आपली  चप्पल  दुरुस्त करण्यासाठी चांभार दादाला दिली ती त्याने लगेच दुरुस्त करून त्याच्या पायात सरकवली आणि जोशीं समोर बसून जोशींच्या निर्णयाची वाट बघायला लागला. जोशींना सुद्धा हा सर्व प्रकार पाहून आपल्या खुजेपणाची लाजच वाटली आणि त्यांनी त्वरित शंभर रुपयाची नोट आपल्या कामासाठी त्या चांभार दादाच्या हातावर ठेवली!-
मित्रांनो या छोट्याशा प्रसंगात आपल्याला खरोखरच सह अनुभूतीच दर्शन घडलं चला आपण पुढच्या भागात असाच प्रसंग पाहूया…
( शब्दांकन -ला.डॉ.शाळीग्राम भंडारी तळेगाव दाभाडे)

error: Content is protected !!